प्रतिनिधी : प्रतीक वाघे
मानवी हक्क अभियान संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पीडित शिक्षिकेच्या तक्रारीची दखल घेत कळंब पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरोधात फसवणूक, शोषण व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक, मानसिक व आर्थिक शोषण केल्याचा तसेच आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप पीडित शिक्षिकेने केला होता. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मानवी हक्क अभियान संघटनेने प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या वेळी मानवी हक्क अभियानचे जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ पवार, उपजिल्हाध्यक्ष श्रीकांत वाघे, जिल्हा कार्याध्यक्ष खालील पटेल, जिल्हा सचिव मोहन ताटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गुन्हा दाखल झाल्याने पीडितेला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, पुढील तपास कळंब पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.
