प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव, दि. १० ऑगस्ट : शिक्षकांच्या विविध प्रलंबित अडी-अडचणी तसेच न्याय्य मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा परिषद कार्यालय, धाराशिव येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर व ठाम पाठिंबा दिला.
शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेतील अनियमितता दूर करणे, पदोन्नती प्रक्रियेत दाखल झालेल्या आक्षेपांची तातडीने सुनावणी घेणे, एकाच कॅम्पसमधील एकत्रित प्राथमिक व माध्यमिक शाळा पूर्वीप्रमाणे स्वतंत्र ठेवणे, प्रलंबित निवडश्रेणीचे प्रश्न निकाली काढणे तसेच रिक्त भाषा, माध्यमिक व विज्ञान विषयांच्या शिक्षक पदांवर पात्र शिक्षकांची नियुक्ती करणे, या प्रमुख मागण्या शिक्षक संघटनांकडून करण्यात आल्या आहेत.
यासोबतच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कोरोना काळातील प्रलंबित जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण करावे, १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ द्यावा तसेच कोरोना काळात शिक्षकांनी जमा केलेल्या निधीचा योग्य विनियोग करावा, अशा विविध मागण्यांचाही आंदोलनात समावेश आहे.
शिक्षक हा शिक्षणव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. शिक्षकांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
या आंदोलनाला पाठिंबा देताना उमेश राजेनिंबाळकर यांनी शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेस पक्ष ठामपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता शासन व प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
यावेळी खलील सय्यद, धनंजय राऊत, सरफराज काझी यांच्यासह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी काँग्रेसचा एल्गार धाराशिव जिल्हा काँग्रेसकडून शिक्षकांच्या धरणे आंदोलनाला ठाम पाठिंबा
