प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर : तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात १६ वर्षे ६ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. काम असल्याचा बहाणा करून मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप असून, त्यानंतर मुलीला तसेच तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ किंवा १८ जुलै २०२६ रोजी रात्री अंदाजे १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे पीडितेने दिलेल्या प्रथम खबरीत म्हटले आहे. गावातील एका तरुणाने ‘माझे तुझ्याकडे काम आहे’ असे सांगून अल्पवयीन मुलीला त्याच्या घरी बोलावून घेतले. त्यानंतर तिला व तिच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर संबंधित तरुणाने पीडितेचा वारंवार पाठलाग केला तसेच तिचे छायाचित्रण करून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पीडितेने ९ ऑगस्ट २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६५(१), ७८, ३५१(२), ३५१(३) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO Act), २०१२ मधील कलम ४ व १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा हा गंभीर प्रकार असल्याने पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. पीडितेची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे.
तुळजापूर हादरले ‘काम आहे’ म्हणत अल्पवयीन मुलीला घरी बोलावले; अत्याचाराचा आरोप, जीवे मारण्याची धमकी POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
