लोहारा परिसरातील जुगार अड्ड्यांवर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची धडक कारवाई; १२ जण ताब्यात, ९.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

लोहारा :
धाराशिव जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लोहारा परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. परि. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तीन पत्ती (तिरट) जुगार अड्ड्यांवर छापा टाकून १२ संशयितांना ताब्यात घेतले असून, या कारवाईत तब्बल ९ लाख २८ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलीस अधीक्षक श्रीमती रीतू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. परि. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार लोहारा येथील काणेगाव रोड तसेच माकणी चौक परिसरातील शंभूराजे हार्डवेअर येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यांवर पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने एकाच वेळी छापेमारी केली.


या कारवाईमध्ये सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सोमवंशी, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र बहुरे, पोलीस कर्मचारी सुरेश कासुळे तसेच क्यूआरटी पथकातील अंमलदार व चालकांनी सहभाग घेतला.


पोलिसांच्या कारवाईत जुगार खेळणारे व संबंधित व्यक्ती मिळून १३ संशयित निष्पन्न झाले असून, त्यापैकी १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर काही संशयित फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ अंतर्गत लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन, एक चारचाकी वाहन, सहा दुचाकी वाहने व इतर साहित्य असा एकूण ९,२८,१६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


धाराशिव जिल्ह्यात अवैध जुगार, मटका, हातभट्टी दारू, अवैध मद्यविक्री, अमली पदार्थांची तस्करी व विक्री तसेच इतर

बेकायदेशीर व्यवसायांविरोधात पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. यापुढेही अशा अवैध धंद्यांविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *