प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर : तुळजापूर शहरातील नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या रस्ते कामावर के. एच. कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रशासनाकडे लेखी निवेदन देत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठेकेदाराने काम मंजुरीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून काही कागदपत्रे खोटी व बनावट असल्याचा संशय आहे. या प्रकरणाशी संबंधित पुरावेही निवेदनासोबत सादर करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ चौकशी सुरू करून सत्य परिस्थिती समोर आणावी, तसेच दोषी आढळणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन महाविकास आघाडीचे गटनेते अमोल माधवराव कुतवळ तसेच नगरसेवक रणजीत इंगळे, आनंद जगताप, अक्षय कदम, प्रगती लोंढे आणि काशिकेश मगर यांनी संयुक्तपणे सादर केले आहे.
या प्रकरणामुळे तुळजापूर शहरात राजकीय वातावरण तापले असून नगरोत्थान योजनेतील कामांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
