प्रतिनिधी : प्रतिक वाघे
तुळजापूर येथील नगरपरिषदेच्या जागेवर नवीन व्यावसायिक गाळे उभारून सुशिक्षित बेरोजगार व महिला बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली आहे. तुळजापूरचे नगरसेवक श्री. मधुकर शेळके यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांना निवेदन देत ही मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नगरपरिषदेच्या मालकीच्या जागेवर तात्काळ सुमारे 100 गाळे उभारण्यात यावेत आणि ते तीन वर्षांच्या करारावर भाडेतत्त्वावर देण्यात यावेत. यामुळे शहरातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती तसेच महिला बचत गटांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल.
नगरसेवक शेळके यांनी सांगितले की, सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून अनेक युवकांना उत्पन्नाचे स्थिर साधन उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत नगरपरिषदेने पुढाकार घेऊन गाळे उभारल्यास स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकते.
या योजनेमुळे केवळ रोजगारच नव्हे, तर शहराच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नगरपरिषद प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
आता मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे या मागणीवर काय निर्णय घेतात, याकडे तुळजापूरकरांचे लक्ष लागले आहे.
