मंकावती गल्लीतील अनधिकृत पार्किंगविरोधात नगरसेवकांची गांधीगिरी; गुलाबफूल देत नागरिकांना जागरूकतेचे आवाहन

Spread the love


प्रतिनिधी : प्रतीक वाघे


तुळजापूर शहरातील मंकावती गल्ली परिसरातील बोळांमध्ये वाढलेल्या अनधिकृत टू-व्हीलर पार्किंगमुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक सुनील पिंटूभैय्या रोचकरी यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. वारंवार सूचना देऊनही व्यापारी व काही नागरिक बोळांमध्ये वाहनं उभी करत असल्याने अखेर नगरसेवकांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला.


या उपक्रमांतर्गत नगरसेवक रोचकरी व नगर परिषद कर्मचाऱ्यांनी संबंधित परिसरात जाऊन नागरिक व व्यापाऱ्यांना गुलाबाचे फूल देत समज देण्याचा प्रयत्न केला. तसेच मंकावती गल्लीतील बोळांमध्ये टू-व्हीलर पार्किंग पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.


यावेळी शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांना स्पष्ट सूचना देण्यात आली की, या बोळांमध्ये कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा वाहन पार्किंग करू नये. अन्यथा प्रशासनाकडून पुढील कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
नगरसेवक सुनील पिंटूभैय्या रोचकरी यांनी आवाहन केले की, शहरातील व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी आपली टू-व्हीलर व इतर वाहने जिल्हा परिषद कन्या शाळा परिसरात पार्क करावीत, जेणेकरून वाहतुकीची कोंडी टाळता येईल.


या वेळी नगरसेवक मधुकर भैय्या शेळके यांनीही उपस्थित राहून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *