प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे चोरीच्या संशयावरून झालेल्या अमानुष मारहाणीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ०३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास निलेगाव येथील मारुती मंदिरासमोर ही घटना घडली. मयत बबन चंदर काळे (रा. पारधी वस्ती, तुळजापूर खुर्द) आणि जखमी सागर जयराम भोलसे हे दोघे गावात आले असता, आरोपी पिंकी शैलेश शिंदे, विकी शैलेश शिंदे आणि राहुल शैलेश शिंदे यांनी त्यांना पकडून ठेवले.
यानंतर गावातील इतर लोकांना बोलावून या दोघांवर ‘चोरी करण्यासाठी आले आहेत’ असा संशय व्यक्त करण्यात आला. यामुळे जमाव आक्रमक झाला आणि उपस्थित आरोपींनी बबन काळे व सागर भोलसे यांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत बबन काळे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी नेण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी फिर्यादी राहुल बबन काळे (वय २१) यांनी दि. ११ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात आरोपी मोहसीन वजोद्दीन इनामदार, पापा वजोद्दीन इनामदार, शंकर उर्फ श्रीधर जमादार, विठ्ठल महादेव घंटे, प्रकाश दशरथ जमादार, धनेश्वर प्रकाश जमादार, आदित्य प्रकाश जमादार, सचिन मारुती जमादार, पवन हनमंत जमादार, दादा बसवराज जमादार, नितीन मारुती जमादार, समर्थ रमेश जमादार, रमेश अर्जुन जमादार, पिंकी शैलेश शिंदे, विकी शैलेश शिंदे आणि राहुल शैलेश शिंदे (सर्व रा. निलेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांनी या घटनेत भा.न्या.सं. कलम १०३(२), ११८(१), ११५(२), १८९, १९०, १९१ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम ३(२)(व्ही) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत असून आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
