धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव : तुळजापूर तालुक्यातील मौजे गंधोरा येथील दोन महिला शेतकऱ्यांनी पवनऊर्जा कंपनीविरोधात गंभीर आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित कंपनीकडून विनापरवाना व बेकायदेशीररीत्या त्यांच्या शेतजमिनीतून ४०० केव्ही उच्च दाबाच्या तारांचे काम करण्यात येत असल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
श्रीमती रेणुका राजेश राठोड व श्रीमती रुक्मिणबाई निलप्पा राठोड यांच्या मालकीच्या गट क्रमांक २८४ व २८५ या जमिनीमधून संबंधित पवनऊर्जा कंपनीने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि कोणताही करार न करता जबरदस्तीने काम सुरू केल्याचे अर्जात नमूद आहे.
जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत वारंवार शेतात घुसून काम केल्यामुळे पिकांचे नुकसान झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.
याप्रकरणी महिला शेतकऱ्यांनी यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रारी अर्ज सादर केले होते. मात्र, कंपनी व काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे या बेकायदेशीर कामावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याशिवाय, तक्रारदारांवर उलट खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या संदर्भात महिला शेतकऱ्यांनी वकिलामार्फत संबंधित कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठवली होती. मात्र, त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांनी दिवाणी न्यायालय, तुळजापूर येथे दावा क्रमांक ५५६/२०२५ दाखल केला असून सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
महिला शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना संबंधित कंपनीला कोणतेही काम करण्यास मनाई आदेश द्यावेत व बेकायदेशीर काम तात्काळ थांबवून दोषींवर कठोर कारवाई करावी.
