प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सेवा दलाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी गांधीजींच्या जीवनकार्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बहुपर्यायी स्वरूपाच्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील तब्बल 300 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महात्मा गांधी यांचे जीवन, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सत्य-अहिंसा, सामाजिक कार्य आणि विचारधारा यावर आधारित विविध प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळावी आणि राष्ट्रपुरुषांच्या विचारांशी त्यांची नाळ जोडली जावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव
प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, ट्रॉफी, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित पुस्तके देऊन गौरविण्यात आले.
प्रथम क्रमांक : दीक्षा वीरेश बिडवे, प्रतीक्षा वीरेश बिडवे आणि निशिगंधा नवनाथ गायकवाड.
द्वितीय क्रमांक : प्रमोद समाधान चोरघडे, हर्षद धनाजी साळुंखे आणि शुभम बालाजी जगताप.
तृतीय क्रमांक : हृषिका सतीश रेणके आणि गपाट पृथ्वीराज रावसाहेब.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
सेवा दलाचे विशेष परिश्रम
प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सेवा दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसोबत शिक्षक आणि पालकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. गांधीजींचे विचार, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास आणि राष्ट्रसेवेची मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर, विश्वास शिंदे, राजेंद्र शेरखाने, धनंजय राऊत, मिलिंद गोवर्धन, शिवाजी गायकवाड, विलास शाळू, जावेद काजी, अमर तागडे, जयसिंग पवार, संजय गजधने, बालाजी राठोड, हरिदास शिंदे, अभिमान पेठे, अशोक पेठे, श्यामसुंदर तोरकडे, मोईज सय्यद, पोपट शिंदे, तानाजी जाधव, मौलाना शौकत, शिवानंद तोडकर, बाळासाहेब बनसोडे, गणपत कांबळे, बसवराज पाटील, समीर साळवी, इस्माईल मुल्ला यांच्यासह काँग्रेस व सेवा दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, सेवा दलाचे नियोजन आणि काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे गांधी-शास्त्री जयंतीचा अभिवादन कार्यक्रम तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाली.
