LCBचा पुन्हा धमाका पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश; ११.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

धाराशिव : पवनचक्कीच्या नवीन विद्युत वाहिनीवरील अॅल्युमिनियम व तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. मांडवा शिवारात चोरीच्या तारांचे बंडल पिकअप वाहनात भरले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर LCB पथकाने धडक कारवाई करत पाच जणांना ताब्यात घेतले, तर चोरीच्या तारा खरेदी करणाऱ्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, मांडवा शिवारात शाम अजिनाथ शिंदे व त्याचे साथीदार येरमाळा, वाशी परिसरातील पवनचक्कीच्या ठिकाणांहून नवीन विद्युत वाहिनीची अॅल्युमिनियम तार चोरी करून आणत असून ती पिकअप वाहनात भरत आहेत.

माहिती मिळताच LCB पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे एक पिकअप वाहन आणि दोन मोटारसायकली उभ्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच पिकअपमध्ये ८ ते १० इसम तारांचे बंडल भरत असल्याचे दिसून आले.

पोलिसांना पाहताच संशयितांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र LCB पथकाने पाठलाग करून पाच जणांना शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे पोलिसांनी सांगितले—

1. शाम अजिनाथ शिंदे, वय २६ वर्षे, रा. मांडवा
2. लाला गोविंद पवार, वय २४ वर्षे, रा. जुनी दूध डेअरी, धाराशिव, ह.मु. मांडवा
3. आकाश श्रीरंग पवार, रा. वरुडा, ता. जि. धाराशिव
4. पवन कालीदास काळे, वय २२ वर्षे, रा. वरुडा, ता. जि. धाराशिव
5. अंगद प्रल्हाद शिंदे, वय ३२ वर्षे, रा. घोसापुरी, ता. जि. बीड — पिकअप चालक

तपासादरम्यान आरोपींकडे पिकअपमध्ये असलेल्या तारांबाबत चौकशी केली असता, तेरखेडा, इंदापूर आणि ढोकी शिवारातील पवनचक्कीच्या नवीन पोलवरील विद्युत वाहिनी कट करून या तारा चोरी केल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोरीच्या तारा विक्री करणाऱ्या व्यक्तीपर्यंत LCB पोहोचले

तपासादरम्यान आरोपी आकाश श्रीरंग पवार याने धाराशिव येथील जाकेर निजाम शेख याला मोठ्या प्रमाणात चोरीच्या तारा विकल्याचे सांगितले. त्यानंतर LCB पथकाने धाराशिव येथे जाऊन जाकेर निजाम शेख याचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने आरोपींकडून चोरीच्या तारा घेतल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईनंतर आरोपींना चोरीच्या मालासह येरमाळा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.

११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी तांब्याची तार, अॅल्युमिनियम तार, पिकअप वाहन आणि दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष म्हणजे, ताब्यात घेतलेला शाम अजिनाथ शिंदे हा नळदुर्ग पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

LCB च्या कारवाईने तार चोरी करणाऱ्या टोळीत खळबळ

पवनचक्कीच्या विद्युत वाहिन्यांवरील तारा चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर झालेल्या या कारवाईमुळे तार चोरीच्या गुन्ह्यांचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या टोळीशी संबंधित आणखी व्यक्ती आणि चोरीच्या घटनांचा तपास केला जात आहे.

कारवाई करणाऱ्या पथकाचे कौतुक

ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, तसेच QRT पथकातील आदित्य बालवाड, रितेश चारले, महेश खरात, चापोह महेबुब अरब, सुभाष चौरे, रोहित दंडनाईक आणि प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *