प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना केशेगाव–तुळजापूर मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पाणी उपशामुळे स्थानिक जलस्रोतांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करत शेतकरी पुत्र तथा रुग्णसेवक मनोज जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत पाणी उपसा तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.
राज्यमार्ग क्रमांक २०८ अर्थात तेर–तुळजापूर–अक्कलकोट मार्गावरील केशेगाव ते तुळजापूरदरम्यान सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. एकीकडे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असताना दुसरीकडे बांधकामासाठी जलस्रोतांचा वापर होत असल्यास त्याचा स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पशुधनावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठ्यांवर सध्या नागरिक तसेच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा भार आहे. आगामी काळात पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे स्रोत, उपशाचे प्रमाण आणि त्याचा स्थानिक जलसाठ्यावर होणारा परिणाम याची प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.
केशेगाव ते तुळजापूरदरम्यान सुरू असलेल्या रस्ते कामासाठी करण्यात येणाऱ्या पाणी उपशाची तातडीने चौकशी करून तो थांबवावा. तसेच दुष्काळी परिस्थितीचा विचार करून रस्ते बांधकामासाठी पर्यायी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सात दिवसांची मुदत; अन्यथा ‘जलाभिषेक आंदोलन’
या प्रकरणी संबंधित विभागाने सात दिवसांच्या आत ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निर्धारित कालावधीत कारवाई न झाल्यास उपलब्ध कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा मनोज जाधव यांनी दिला आहे. यामध्ये संबंधित जलस्रोताच्या ठिकाणी ‘जलाभिषेक आंदोलन’ करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, पाणी उपशामुळे प्रत्यक्षात स्थानिक जलसाठ्यावर किती परिणाम होत आहे, याची प्रशासनाने वस्तुनिष्ठ पाहणी करून अहवाल तयार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. यामुळे दुष्काळी परिस्थितीत बांधकामासाठी पाण्याचा वापर करण्यासंबंधीचे नियम, परवानग्या आणि उपलब्ध जलस्रोतांची स्थिती याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी धाराशिव तसेच पाटबंधारे विभाग क्रमांक २, तुळजापूर यांना देण्यात आल्या आहेत.
आता सार्वजनिक बांधकाम विभाग या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करतो का, पाणी उपशाबाबत कोणती कारवाई केली जाते आणि बांधकामासाठी पर्यायी पाण्याची व्यवस्था केली जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
