“SIRच्या नावाखाली मतदार यादीत फेरफार धाराशिव काँग्रेस आक्रमक ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईची मागणी”

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

धाराशिव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने; ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून अटक करण्याची मागणी

धाराशिव : विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात SIR प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार यादीत फेरफार व मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन देत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हा काँग्रेसच्या निवेदनानुसार, भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही असून स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे घटनात्मक कर्तव्य आहे. मात्र, मागील काही काळात निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

SIR प्रक्रियेवर काँग्रेसचे गंभीर आक्षेप

निवेदनात विशेष सखोल पुनरावलोकन अर्थात SIR प्रक्रियेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी काही निर्णयांवर आक्षेप घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याचा उल्लेख काँग्रेसने केला आहे.

The Indian Expressच्या 25 सप्टेंबर 2026 रोजीच्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांत किमान 14 वेळा मतदार नोंदणी, मतदारांची नावे वगळणे किंवा पुनर्स्थापित करणे आणि मतदार यादीच्या IT प्रणालीशी संबंधित निर्णयांवर आक्षेप नोंदवल्याचे समोर आले आहे.

निवेदनात SIR, नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे तसेच निवडणूक आयोगाच्या IT प्रणालीच्या केंद्रीकरणासंदर्भातील निर्णयांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाची वेगळी भूमिका

दरम्यान, या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने संबंधित वृत्तांनंतर स्पष्टीकरण देत SIRसह आयोगाचे सर्व निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीने आणि सर्वानुमते झाले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात काँग्रेसचे आरोप आणि निवडणूक आयोगाची भूमिका यांच्यात स्पष्ट मतभेद असल्याचे दिसून येते.

पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्रातील मतदार यादीचा मुद्दा

काँग्रेसच्या निवेदनात पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळल्याचा, बिहारमध्ये SIR प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर नावे हटविल्याचा तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये मतदार यादीत कथित अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांचाही निवेदनात संदर्भ देण्यात आला असून, या सर्व प्रकरणांची स्वतंत्र, निष्पक्ष आणि न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली.

दुष्काळाच्या GRची होळी; हेक्टरी एक लाख रुपयांची मागणी

या आंदोलनादरम्यान काँग्रेसच्या वतीने शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळाच्या GRची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीबाबत शासनाचा GR स्पष्ट नसल्याचा आरोप करत काँग्रेसने सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांची कथित फसवणूक न करता तुळजापूर तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

उमेश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश इंद्रसिंह राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी राजेंद्र शेरखाने, मलंग शेख, पांडुरंग तात्या कुंभार, प्रशांत पाटील, विलास साळू, खलील सय्यद, ॲड. सय्यद इनामदार, धनंजय राऊत, ॲड. जावेद काझी, अग्निवेश शिंदे, विनोद वीर, आप्पासाहेब शेळके, दयानंद पाटील, सोमनाथ मिश्किन, सिराज मोगल, अमर तागडे, अरविंद बागडे, अर्जुन बिराजदार, पृथ्वीराज देशमुख, महबूब पटेल, अमोल कुतवळ, गोदावरी केंद्रे, मनीषा वाघमारे, मिलिंद गोवर्धन, शिवानंद तोडकर, महेश म्हेत्रे, गणेश पवार, सरफराज काझी, गोरोबा झेंडे, प्रभाकर लोंढे, संकेत पडवळ, फुरखान शेख, आबेदीन कुरेशी, नसीर इनामदार, सईद बागवान, पोपट शिंदे, मोईज सय्यद, भारत काटे, जीवन चौगुले यांच्यासह प्रदेश पदाधिकारी, विविध सेलचे प्रमुख, तालुका कार्याध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला, युवक व विद्यार्थी पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कायम ठेवण्याची मागणी

निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा आधार असल्याने मतदार यादी, मतदार नोंदणी आणि नावे वगळण्याच्या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता असणे आवश्यक आहे, अशी भूमिका काँग्रेसने निवेदनातून मांडली.

SIR प्रक्रियेसह मतदार यादीतील कथित अनियमितता, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेले प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या दुष्काळी मदतीचा मुद्दा यावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवावा, अशी मागणी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *