प्रतिनिधी : प्रतीक वाघे
तुळजापूर तालुका खरेदी-विक्री संघात १ मे रोजी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी चेअरमन सौ. अनिता श्रीकांत वाघे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देत उपस्थितांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा गौरव केला तसेच कामगार चळवळीच्या इतिहासाची आठवण करून दिली. यावेळी सौ. वाघे यांनी आपल्या मनोगतात कामगार हे कोणत्याही संस्थेचा आधारस्तंभ असून त्यांच्या परिश्रमामुळेच संस्थेची प्रगती शक्य होते, असे नमूद केले.
कार्यक्रमात सर्व कामगारांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील काळातही निष्ठेने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास श्रीकांत वाघे, दयानंद क्षीरसागर, शेतकरी संजय शिंदे यांच्यासह संघाचे पदाधिकारी, कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
