“धाराशिवमध्ये शेतकरी होरपळला! कोरडा दुष्काळ जाहीर करा, नाहीतर ८ दिवसांत रस्त्यावर उतरू; सरकारला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रमक इशारा!”

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे


तुळजापूर.
धाराशिव जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके गंभीर संकटात सापडली असून, आगामी रब्बी हंगामावरही त्याचे सावट निर्माण झाले आहे. अनेक भागांत पाण्याची परिस्थिती बिकट होत असून विहिरी व कूपनलिका कोरड्या पडल्याने शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण भागातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात तातडीने ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रविंद्र भिमाशंकर इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तुळजापूर तहसीलदार यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. यावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन मदतकार्य सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची मदत द्या

पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याने बाधित शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई तातडीने मं

जूर करून त्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

कर्जमाफीसह पाणी आणि चाऱ्याची मागणी

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून, राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी बँकांकडील शेतकरी कर्जे पूर्णपणे माफ करावीत. कोणत्याही अटी न ठेवता १०० टक्के विनाअट कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

यासोबतच दुष्काळग्रस्त गावांमध्ये मोफत चारा छावण्या सुरू कराव्यात, पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता करून द्यावी आणि गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकर सुरू करावेत, अशी मागणीही करण्यात आली.

विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करण्याची मागणी

दुष्काळामुळे ग्रामीण कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील मुला-मुलींचे संपूर्ण शिक्षण शुल्क माफ करावे, अशी मागणीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

८ दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा जिल्हाभर आंदोलन

शासनाने पुढील ८ दिवसांच्या आत धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून तातडीने मदतकार्य सुरू केले नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, पाणीटंचाई, चारा प्रश्न आणि पिकांचे नुकसान लक्षात घेता शासनाने केवळ कागदी घोषणा न करता प्रत्यक्ष मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशी भूमिका संघटनेने मांडली.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रविंद्र इंगळे, प्रदेशाध्यक्ष घनश्याम चौधरी, कल्याणभाऊ भोसले, राजाभाऊ लकडे, दुर्वास भोसले, मकबुल सुभानी, शहाजी सोमवंशी, धनाजी पेंदे, आबाजी नरवडे, बळीराम बाबर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *