प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव : धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग विभागाला मोठी चालना मिळाली आहे. अत्याधुनिक ‘मॉड्युलर पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट’ उभारण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व साधनसामग्री खरेदीसाठी राज्य शासनाने ८ कोटी ५५ लाख ५ हजार २४४ रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे.
याबाबतचा शासन निर्णय ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आला. ही माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
सन २०२६-२७ या आर्थिक वर्षातील राज्य योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून ‘मॉड्युलर पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट ऑन टर्न की’ उभारण्यात येणार आहे. या सुविधेमुळे गंभीर आजारांनी बाधित बालरुग्णांना तातडीचे आणि अत्याधुनिक अतिदक्षता उपचार धाराशिवमध्येच उपलब्ध होणार आहेत.
सध्या गंभीर बालरुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे हलवावे लागते. नव्या पेडियाट्रिक आयसीयूमुळे ही गरज मोठ्या प्रमाणात कमी होऊन जिल्ह्यातील तसेच परिसरातील बालरुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे धाराशिवच्या शासकीय आरोग्य व्यवस्थेला महत्त्वपूर्ण बळकटी मिळणार आहे.
या निर्णयाबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्हावासीयांच्या वतीने आभार मानले.
