हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहर काँग्रेसचा सेवाभावी उपक्रम अन्नदानासह २०० वृक्षांची लागवड

Spread the love

प्रतिनिधी : प्रतीक वाघे

धाराशिव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. वाढदिवस केवळ उत्सवाच्या स्वरूपात साजरा न करता सेवा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत साजरा करण्यात आला.


धाराशिव शहरातील सिव्हिल हॉस्पिटलसमोर, मारवाड गल्ली परिसरातील अन्नपूर्ण छत्रालयात अन्नदानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. गेल्या दहा वर्षांपासून अन्नपूर्ण छत्रालयाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना निस्वार्थपणे भोजन उपलब्ध करून दिले जात आहे. या सेवाभावी कार्याला हातभार लावत काँग्रेस कमिटीच्या वतीने अन्नदान करण्यात आले.


यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक तसेच गरजू नागरिकांना भोजनाचे वाटप करण्यात आले. गरजूंच्या सेवेत सहभागी होणे हीच सामाजिक बांधिलकी असून, वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा हा प्रयत्न असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


🌳 हातलादेवी डोंगरावर २०० वृक्षांची लागवड
दरम्यान, धाराशिव शहरालगत असलेल्या हातलादेवी डोंगर परिसरात तब्बल २०० झाडांची वृक्षलागवड करण्यात आली. केवळ वृक्षलागवड करून न थांबता लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


पर्यावरणाचे संरक्षण, शहरातील हरित क्षेत्र वाढविणे आणि भावी पिढ्यांसाठी निसर्गाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या उद्देशाने वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.


मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, ‘वाढदिवसाचा आनंद समाजसेवेतून’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.


अन्नदान आणि वृक्षलागवड उपक्रमात धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांनी हर्षवर्धनजी सपकाळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.


यावेळी शहराध्यक्ष धनंजय राऊत यांच्यासह राजेंद्र शेरखाने, प्रशांत पाटील, गोरोबा झेंडे, पोपट शिंदे, हरिदास शिंदे, बाबा मोमीन, संजय गजधने, अंकुश पेठे, अभिमान पेठे, आरेफ मुलानी, सरफराज काझी, अविनाश रणखांब, प्रेमानंद सपकाळ, अशोक बनसोडे, सय्यद मन्सूर, अवेदाबाई चव्हाण, सुरेश जगताप, सुरेंद्र पाटील, राजेंद्र राऊत, विश्वजीत बनसोडे, आकाश चव्हाण, चव्हाण तसेच धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सेवा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा त्रिवेणी संगम साधत साजरा करण्यात आलेला हा वाढदिवसाचा उपक्रम धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *