प्रतिनिधी : प्रतीक वाघे
धाराशिव : राज्याचे माजी गृहमंत्री, ज्येष्ठ लोकनेते आणि मराठवाड्याच्या विकासातील महत्त्वाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे मा. डॉ. पद्मसिंह पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत कार्यकर्ते, नागरिक आणि विविध संस्थांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
डॉ. पद्मसिंह पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत मराठवाडा आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. रेल्वे मार्गांच्या विस्तारासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नांदेड–धाराशिव–पुणे–मुंबई तसेच सोलापूर–तुळजापूर–धाराशिव रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जाते.
सिंचन क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांची उभारणी, साठवण तलावांची निर्मिती तसेच विविध सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेती विकासाला चालना मिळाली. निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून धाराशिव शहरासाठी पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यास मदत झाली.
साखर उद्योग क्षेत्रात जिल्ह्यातील दोन कारखान्यांपासून सुरू झालेला प्रवास २२ साखर कारखान्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांच्या नेतृत्वाचा मोठा वाटा मानला जातो. त्यामुळे हजारो शेतकरी आणि कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
शैक्षणिक क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्रांची निर्मिती, विविध शैक्षणिक संस्थांना पाठबळ आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे आणि समाजकार्यातून जनतेची सेवा करण्याची ऊर्जा कायम राहावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या.
डॉ. पद्मसिंह पाटील यांचे राजकीय, सामाजिक आणि विकासाभिमुख कार्य आजही अनेकांसाठी प्रेरणादायी असून मराठवाड्याच्या जडणघडणीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते.
