कमान वेस परिसरातील हायमास्ट लाईट बंद; भाविकांच्या सुरक्षेसाठी तातडीने दुरुस्तीची मागणी

Spread the love

प्रतिनिधी: धाराशिव


तुळजापूर : तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुळजापूर येथे देशभरातून हजारो भाविक श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दररोज येत असतात. विशेषतः रात्री अपरात्रीही भाविकांची ये-जा सुरू असते. मात्र, शहरातील कमान वेस परिसरातील हायमास्ट लाईट बंद पडल्यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.


नगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी हायमास्ट लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी कमान वेस येथे ही लाईट वारंवार बंद पडत असल्याची तक्रार समोर आली आहे.

सध्या तर दुरुस्ती करूनही लाईट सुरू होत नसल्याने परिसरात अंधाराचे वातावरण निर्माण झाले आहे.
कमान वेस परिसर हा भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून येथे मोठ्या प्रमाणात पुजारी वर्ग वास्तव्यास आहे.

त्यामुळे रात्रीच्या वेळी येणाऱ्या भाविकांना मार्गक्रमण करताना अडचणी निर्माण होत आहेत. अंधारामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.


या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगरपालिकेकडे निवेदन देत संबंधित हायमास्ट लाईटची तातडीने दुरुस्ती करावी किंवा आवश्यक असल्यास नवीन लाईट बसवावी, अशी मागणी केली आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरीत कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *